X: @therajkaran
मुंबई: गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडुया भारतीय संस्कृतीशी नाळ, असे घोषवाक्य पुकारत मुंबई शहर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाली, त्यानिमित्ताने पारंपरिक तसेच शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देणे व युवकांना पारंपरिक खेळांसाठी अवकाश प्राप्त करून देणे, यासाठी या महाकुंभ स्पर्धा प्रजासत्ताक दिन ते १९ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा महाराष्ट्र शासन, बहन्मुंबई शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात येत आहेत. कुर्ला, पूर्व नेहरूनगर येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. मुंबईतील विविध ठिकाणच्या २० मैदानांवर ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी आयोजित करण्यात येत असून स्पर्धा समारोप शिवजयंती दिनी १९ फेब्रूवारी रोजी सायंकाळी चार वाजता, जांबोरी मैदान येथे होईल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
या महाकुंभ स्पर्धेत पंजा लढवणे, मल्लयुद्ध, शरीरसौष्ठव, दंड बैठक, दोरीउडी, पावनखिंड दौड (मॅरेथॉन) मल्लखांब, लेझिम, लगोरी, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, ढोल ताशा पथक, विटी-दांडू, खो-खो आदि खेळांचा समावेश आहे. आट्यापाट्या या पारंपरिक खेळाचा समावेश केल्यास या खेळाचे पुनरुज्जीवन होईल, अशा प्रश्नावर विचार करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी दिले.
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील भव्य मंदिरात होत आहे. त्यानिमित्ताने चित्रकला, काव्यलेखन, निबंध तसेच नाट्यछटा स्पर्धा १० जानेवारीपासून आयोजित करण्यात आल्या, अशी माहितीही मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.
Also Read: ठाकरेंचा खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : मंत्री दीपक केसरकर यांची टीका