मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि “ई-बस” सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक सवलतीच्या पास योजनांचा लाभ मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केली.
सरनाईक म्हणाले, “या पास योजनेचा उद्देश नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे.”
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि ‘शिवाई’ प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या सेवांचा विस्तार करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक प्रवाशांनी ई-बस सेवेसाठी पास योजना सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना अधिक सोयीस्कर, परवडणारा आणि पर्यावरणपूरक प्रवास देण्यासाठी एसटीने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
पास योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
उपलब्धता:
• ही पास योजना ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस, आणि ई-शिवाई सेवा मध्ये लागू असेल.
• (टीप: ई-शिवनेरी बससेवा यामधून वगळलेली आहे.)
मासिक पास (३० दिवस):
• २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांचा पास प्रवाशांना दिला जाईल.
त्रैमासिक पास (९० दिवस):
• ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास दिला जाईल.
सेवा वर्गातील लवचिकता:
• उच्च श्रेणीतील पासधारक (ई-बस प्रवासी) निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.
फरक भाडे नियम:
• जर साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करीत असेल, तर दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.
महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, तसेच स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.