मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप याद्यांबाबत हरकती, सूचना किंवा तक्रारी 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्यांचा आधार या महानगरपालिका निवडणुकांसाठी घेतला जाणार आहे. या मूळ विधानसभा याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या असून त्यांचे प्रभागनिहाय विभाजन महानगरपालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व महानगरपालिकांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांना आपले नाव ऑनलाइन तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खालील संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे:
या संकेतस्थळावर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की,
- प्रभागनिहाय याद्या तयार करताना विधानसभा यादीप्रमाणेच मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात.
- नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्ता दुरुस्ती करण्याची प्रक्रिया या टप्प्यात केली जात नाही.
मात्र प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या तांत्रिक किंवा लेखनिकांच्या चुकांबाबत —
- मतदाराचा चुकून प्रभाग बदलला जाणे,
- विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव न दिसणे,
- किंवा इतर तांत्रिक त्रुटी —
अशा तक्रारी महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

