सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा; शिंदे–पवार यांचीही दिलासादायी भूमिका
मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडलांतील शेतकरी पूरग्रस्त झाले आहेत. या बळिराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रालयात संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये आणि नरेगा योजनेंतर्गत हेक्टरी 3 लाख रुपये दिले जातील.” तसेच, पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात 68 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 60 लाख शेतकरी बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी “सर्व निकष बाजूला ठेवले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडे लवकरच मदतीसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विमा कंपन्यांशी बोलणी करून सुमारे 5,500 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की –
• विहिरींच्या नुकसानीसाठी 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल.
• कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 18,500 रुपये,
• हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये,
• बागायती शेतीसाठी 32,500 रुपये,
तर रब्बी पिकांसाठी बियाण्यांसाठी 10,000 रुपये देण्यात येतील.
• दूध उत्पादकांना जनावरांसाठी भरपाई, आणि
• धरणातील गाळ वापरून जमिनी पुन्हा उपजाऊ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना पुन्हा उभे करेल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत देताना कोणतेही निकष आड येऊ देणार नाही.”
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आजवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे.” त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक साखर कारखाने स्वयंस्फूर्तीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे सहाय्य देत आहेत. “हा सामाजिक बांधिलकीचा विषय आहे,” असेही ते म्हणाले.