राज्य निवडणूक आयुक्तांचे सर्व आयुक्तांना सक्त निर्देश
मुंबई : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांतील ‘दुबार नावे’ हा मोठा वादग्रस्त मुद्दा ठरला. सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राज्य निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर, आयोगाने आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची नावे येऊ नयेत यासाठी आज निर्णायक पावले उचलली.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त डॉ. दिनेश वाघमारे यांनी सर्व २९ महानगरपालिका आयुक्तांची तब्बल पाच तासांची मॅरेथॉन बैठक घेऊन, मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे, तसेच प्रत्यक्ष मतदानावेळीही सतर्कता वाढवण्याचे सक्त निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी बैठकीस उपस्थित होते.
Final Voter List 10 डिसेंबरला — हरकतींचा वेळेत निपटारा आवश्यक
डॉ. वाघमारे यांनी सांगितले—
● प्रारूप मतदार याद्यांवर हरकती/सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२५ होती.
● या हरकतींचा निपटारा करून १० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध कराव्या.
● सर्व हरकतींवर तत्पर आणि योग्य कार्यवाही करणे महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.
दुबार मतदार शोधण्यासाठी कठोर पद्धत
आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार—
● संभाव्य दुबार मतदारांची यादी महानगरपालिकांनी सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रकाशित करावी.
● अशा मतदारांच्या नावांपुढे दोन स्टार ( ** ) चिन्ह दिलेले असेल.
● संबंधित मतदाराने तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे कळवण्यासाठी अर्ज (विहित नमुना) भरावा.
● मतदाराने दिलेल्या मतदान केंद्राबाहेर त्याला मतदान करता येणार नाही.
मतदाराने प्रतिसाद न दिल्यास…
● तो मतदार मतदान केंद्रावर आल्यावर, त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही/करणार नाही, याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येईल.
● हमीपत्रासोबत काटेकोर ओळख तपासणी केल्यानंतरच मतदानाची परवानगी.
मतदार यादीचे विभाजन कसे होते? — काकाणी यांचे स्पष्टीकरण
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले,
● स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मूळ यादी जशीच्या तशी वापरली जाते.
● महानगरपालिका निवडणुकीसाठी केवळ प्रभागनिहाय विभाजन केले जाते; मतदारांचे नावे व पत्ते बदलले जात नाहीत.
● या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्याच वापरल्या जातील.

