मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज जगप्रसिध्द आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy ) यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती (Sudha Murti ) यांची राज्यसभेसाठी (Rajya Sabha) निवड केल्याची घोषणा आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन केली आहे.
सुधा मुर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Infosis Foundation) अध्यक्षा असून त्या टाटा कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला इंजिनिअर आहेत. त्यांचा विवाह इंजिनिअर नारायण मूर्ती यांच्याशी झाला. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीची भारतात स्थापना केली आणि आज यशस्वी उलाढाल करणारी जगातील एक प्रख्यात आयटी कंपनी आहे.
इन्फोसिसच्या निर्मितीत सुधा मूर्ती यांचाही मोठा सहभाग आहे. सुधा मूर्ती यांचे दागिने घेऊन त्यातून नारायण मूर्ती यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली होती. सुधा मूर्ती या शिक्षिका आणि लेखिका देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. आपल्या साध्या आणि पारंपारिक मुल्ये जतन करणाऱ्या स्वभावामुळे त्या प्रसिद्ध आहेत.
सन 2006 मध्ये मूर्ती यांना भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री (Padma shree) या भारतातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुधा मुर्ती यांची कन्या अक्षता या लंडनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांची पत्नी आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर (X) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधा मूर्ती यांनी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान दिलं आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती हा आपल्या नारी शक्तीचा एक सशक्त पुरावा आहे. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेतील उपस्थिती महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी मी सुधा मूर्ती यांना शुभेच्छा देतो.