By Nalawade
मुंबई — “माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत आणि त्याच्याशी माझा दूरान्वये संबंध नाही. पण स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करत फिरायचं—हा त्यांचा आजपर्यंतचा धंदाच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर जोरदार पलटवार केला.
त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली. “जे हिस्ट्रीशिटर आहेत, त्यांनी आपलीच हिस्ट्री जरा मागे वळून पाहावी,” अशी उपरोधिक टोचणीही त्यांनी लगावली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेली घटना “अत्यंत निंदनीय” असल्याचे सांगत खा. तटकरे म्हणाले, “सकाळपासूनच नामदारांचा मुलगा लवाजम्यासह शहरात फिरत होता. मतदान केंद्रात जाऊन अधिकाऱ्यांशी वाद घालत होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केंद्रात प्रवेशाची मुभा उमेदवार, प्रतिनिधी आणि पोलिंग एजंटपुरती असते. त्यामुळे कायद्याचा भंग आधीच झाला आहे.”
आपल्या आयुष्यात कधीही अशा पातळीचे कृत्य केले नसल्याचे सांगताना तटकरे यांनी नाव न घेता चोख टोला हाणला, “ज्यांचे संपूर्ण आयुष्य हिस्ट्रीशिटर म्हणून गेले, त्यांनी तरी अशा भाषेत बोलण्याचे साहस करू नये. चार वर्षांपूर्वी संयुक्त शिवसेनेत जिल्हाप्रमुखाला कोणी मारहाण केली होती—ते महाराष्ट्र विसरलेला नाही.”
जाबरे प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “सुशांत जाबरे हा एकेकाळी त्यांचा जवळचा माणूस होता. तो तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत आला, हा आकस त्यांनीच मनात धरलेला आहे. जाबरे यांनी शिवसेना का सोडली—ते सर्वांनाच माहिती आहे.”
महाडमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित होणे महत्त्वाचे असताना ज्या पद्धतीची “गुंडगिरी” झाली, ती अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आज मी ७१ वर्षांचा आहे—हे भानही त्यांनी विसरले. एकेरी भाषा वापरून त्यांनी आपली विकृत मानसिकता संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडी पाडली,” असा कडक शब्दातील हल्लाबोल तटकरे यांनी केला.
मतदानाच्या दिवशी ते रोहा, श्रीवर्धन आणि नगरपंचायत क्षेत्रात आपल्या सहकाऱ्यांना व मतदारांना भेटण्यासाठी गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

