मुंबई : खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसविरोधात तातडीने कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या भेटीत त्यांनी यासंदर्भात लिखित निवेदन सादर केले.
ॲड. मातेले यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास खालील गंभीर बाबी आणून दिल्या: ११वी-१२वी साठी कोचिंग क्लासेस व कॉलेज यांच्यातील संगनमताने लाखो रुपयांचे शुल्क घेऊन अनधिकृत ‘इंटिग्रेटेड अभ्यासक्रम’ चालवले जातात. कॉलेज शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. विद्यार्थी कॉलेजला उपस्थित राहत नाहीत, हजेरी बनावट दाखवली जाते. प्रॅक्टिकल शिक्षणाचा अभाव आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा अनुभव मिळत नाही. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तासन्तास चालणाऱ्या क्लासेसमुळे विद्यार्थी व पालक तणावाखाली आहेत. शासन मान्यतेशिवाय सुरू असलेले कोर्सेस: शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ॲड. मातेले यांची मुख्य मागणी:
• सर्व इंटिग्रेटेड क्लासेसवर चौकशी व तपासणी
• बनावट हजेरी दाखवणाऱ्या महाविद्यालयांवर शिस्तभंगात्मक कारवाई
• शालेय शिक्षण संचालनालयामार्फत अशा अभ्यासक्रमांवर बंदी
• धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नियमावली तयार करणे
• संपूर्ण व्यवस्थेच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करणे
माध्यमांशी बोलताना ॲड. मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षणाची गुणवत्ता खाजगी शिकवणीच्या बेकायदेशीर धंद्यात भरडली जात आहे. शिक्षण ही सामाजिक जबाबदारी आहे, ती बाजारू नफ्यासाठी बळी पडू नये.”
शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित विभागाला चौकशीचे निर्देश लवकरच दिले जातील, असे आश्वासन दिले.