मुंबई : शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पायदळी तुडवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर २९३च्या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी कोरडवाहू पिकांसाठी १३,५००, बागायतीसाठी २७,०००, तर फळबागांसाठी ३६,००० रुपये मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु निवडणुकीनंतर या रकमा अनुक्रमे ८,५००, १७,००० आणि २२,००० इतक्या कमी करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मदतीची मर्यादा ३ हेक्टरवरून २ हेक्टरपर्यंत खाली आणली आहे.
सरकारने कर्जमाफी देण्याऐवजी समिती नेमण्याची भाषा सुरू केली असून, शेतकऱ्यांना समिती नको, तर सरळ सरसकट कर्जमाफी हवी आहे, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. सोयाबीन आणि धानाला हमीभाव मिळत नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
कृषिमंत्र्यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. कृषी खात्याचे वर्णन ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे करत असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा आणि त्यांना हवे असल्यास दुसरे खाते देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, खतांचे, औषधांचे दर वाढले असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत ‘शेतकऱ्यांना पैसे दिले’ ही भाषा म्हणजे एका खिशात टाकून दुसऱ्या खिशाला कात्री लावण्यासारखी आहे.
सरकार उद्योगपतींची कर्जमाफी करते, विविध प्रकल्पांसाठी मोठा निधी देते, पण शेतकऱ्यांना मदतीसाठी हात आखडता घेतो, अशी टीका त्यांनी केली. तसेच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधामागे शेतकऱ्यांचा आवाज आहे, विरोधक केवळ त्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीकविमाच्या बाबतीतही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगत त्यांनी विचारले की, विम्याचे पैसे भरल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, मग हे पैसे कोण घेत आहे? शेतजमीन दाखवून कोणी पैसे उचलले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.