मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्षे होत आली, तरी आजही सर्व दरडग्रस्त कुटुंबांचे पुर्नवसन झालेले नाही, ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणली.
दानवे म्हणाले, “या दुर्घटनेत ६६ लोकांचा मृत्यू झाला. शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते, मात्र केवळ ६६ कुटुंबांनाच घरे मिळाली असून, उर्वरित कुटुंब आजही असुरक्षित ठिकाणी राहतात. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवास यांचा अभाव अद्याप कायम आहे.”
त्यांनी यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करत आगामी पावसाळ्यात अशाच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पुर्नवसन करण्याची मागणी केली. यासोबतच माळीण (पुणे) आणि कर्जत तालुक्यातील दरड दुर्घटनांचा उल्लेख करत, सरकारने अशा घटनांकडे अद्यापही गंभीर दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दानवे यांनी आज विधान परिषदेत महाराष्ट्र विधानपरिषद नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा घेण्याची सूचना सादर केली