पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये नगरसेवकांच्या शिफारसीनुसार भरला जाणारा विद्यार्थ्यांचा कोटा रिकामा राहिला होता. निवडणुका न झाल्यामुळे नगरसेवक पदे रिक्त असून, त्यामुळे काही मुलांचे प्रवेश रखडले होते.
या मुद्द्यावर आम आदमी पार्टीचे मनोज शेट्टी व श्रद्धा शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, अखेर महापालिका प्रशासनाने हा कोटा खुल्या पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी लॉटरीतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे साठ विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक प्रवेश मिळणार असून, कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी इंग्रजी विद्यालय आणि येरवडा येथील मातोश्री इंग्रजी शाळेमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
सध्या पुणे शहरात आकांक्षा फाउंडेशनमार्फत पाच आणि आयटीच फाउंडेशनमार्फत सात शाळा महापालिकेच्या सहकार्याने चालवल्या जातात. शिक्षण हक्क कायद्यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या परिसरात शाळा उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या शाळांमध्ये नगरसेवक कोट्याअंतर्गत होणारे प्रवेश बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, ही तरतूद रद्द करून पूर्णतः पारदर्शक प्रवेशप्रक्रिया राबवावी, अशी मागणी ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.