मुंबई: राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आज विधानसभेत जवळपास तासभर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असून, या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
पुण्यातील आमदार सुनिल कांबळे यांनी विधानसभा नियम 105 अंतर्गत ही लक्षवेधी सूचना मांडली होती.
उत्तरात राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, पुण्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार सध्या शहरात ४० लाख ४२ हजार ६५९ वाहने आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
त्यामध्ये नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन, स्मार्ट सिग्नल्स, सीसीटीव्ही प्रणालीचा अधिक उपयोग, तसेच वाहतूक बेट, पथ दुभाजक, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग व बसथांब्यांचे स्थलांतर यांचा समावेश आहे.
मिसाळ यांनी स्पष्ट केले की, २०५४ पर्यंतच्या लोकवस्तीचा विचार करून रिंगरोड, बायपास, उड्डाणपूल आणि मेट्रोसारख्या पर्यायी वाहतूक सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
वाहतूक सुधारणा विषयक महापालिकेचे विभाग आणि वाहतूक पोलिस विभाग नियमित बैठक घेत असून, आगामी काळात स्थानिक लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करून सुधारणा केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक आराखड्याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.