मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती सरकार नियोजनशून्य पद्धतीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामांचे आराखडे तयार करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि शहररचनाकार अनंत गाडगीळ यांनी केली.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असून काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. अशा काळात एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे ठरल्याचे गाडगीळ म्हणाले. या निर्णयामुळे परळ, शिवाजी पार्क, माहीम ते दादर-माटुंगा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे पेट्रोलचा अनावश्यक वापर वाढत आहे, प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे आणि जनतेच्या वेळेचे नुकसान होत आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्राला अशा निर्णयांमुळे आणखी तोटा सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गाडगीळ म्हणाले, “आज रस्त्यांवरील गर्दीमुळे अशी परिस्थिती असेल, तर ऐन दिवाळीत येथे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होऊ शकतो.”