By राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : “पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज अभिवादन सभेत मांडलेले मुद्दे शासन दरबारी नक्कीच पाठपुरावा करून मार्गी लावले जातील,” अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते.
कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, महिला अध्यक्षा शोभा जयपूरकर, सह प्रसिद्धी प्रमुख भारत निगडे, डिजिटल मीडिया विभागाचे अनिल वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरस्कर आणि माजी अध्यक्ष गजानन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
“बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नैतिकता आणि जबाबदारीने आपले कार्य करणे आवश्यक आहे,” असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
“मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. आजच्या कार्यक्रमात संपूर्ण राज्यातून पत्रकारांची उपस्थिती हेच याचे अधोरेखन करते. परिषदेसाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत करण्यात येईल,” असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात एस. एम. देशमुख म्हणाले, “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना वंदन करणे, ही भाग्याची गोष्ट आहे. कोकणची भूमी ही महापुरुषांची आहे. बाबुराव पराडकर यांनी हिंदी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. त्यांचेही स्मारक पराड येथे व्हावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे करतो.”
या अभिवादन सभेत गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बीड, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दूरध्वनीद्वारे सहभाग घेत शुभेच्छा दिल्या. “पत्रकारांना आवश्यक सहकार्य देण्यासाठी सरकार सदैव तयार आहे,” असे ते म्हणाले. आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून “देशाचे भविष्य हे पत्रकारितेवर अवलंबून आहे. आज पत्रकारितेने आत्मपरीक्षणाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत एस. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत भारत निगडे, दीपक कैतके, हरीश पाटणे, सूर्यकांत नेटके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.