मुंबई – महायुती सरकारच्या कारभाराचे दिवसागणिक वाभाडे निघत आहेत. हे सत्ताधारी केवळ संपत्तीच्या विकासात मश्गूल असून जनतेच्या हिताची त्यांना कोणतीच पर्वा उरलेली नाही. त्यामुळे या सरकारची नाव शेवटपर्यंत जाणार नाही, असे तीव्र भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी महायुती सरकारवर तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “मुंबई अदानीला दिली जात आहे. धारावीची जमीन, टर्मिनल, नवी मुंबई विमानतळाचे काम, अगदी डंपिंग ग्राऊंड आणि एमएसआरडीसी इमारतसुद्धा बहाल केली गेली. हे सगळं खाऊनही यांचे पोट भरत नाही, आणि शरम तर अजिबात नाही. पण शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मात्र काहीच मिळत नाही. लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत, पण जनतेसाठी नाहीत,” असा संतप्त आरोप त्यांनी केला.
सपकाळ पुढे म्हणाले, “आता मंत्रालय आणि विधानभवन अदानीला कधी देणार, हे तरी स्पष्ट करा. कुर्ला मदर डेअरीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, ही आमची जोरदार मागणी आहे.”
ध्वनीक्षेपकांच्या वापरावर गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर टीका करताना सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांबाबत गृहविभागाने काढलेले परिपत्रक म्हणजे सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले आहेत, ते पाळावेत. गृहविभागाने आपला फतवा त्वरित मागे घ्यावा.”
यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना सपकाळ म्हणाले, “सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना लागत मूल्यात दिडपट भाव, उत्पन्न दुप्पट, कर्जमाफी अशा आश्वासनांचा पाऊस पाडला. पण ‘क्या हुवा तेरा वादा?’ अशी स्थिती झाली आहे. हे फक्त रघुकुल रिती म्हणायचे आणि वचन पाळायचे नाही, ही अधर्मी वृत्ती आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान वीस हजारांची भरपाई मिळावी, यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहोत.”
महायुतीतील मंत्री निधीच्या तुटवड्यावरून नाराज असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. “हे पक्ष निधीसाठीच एकत्र आले होते, पण आता निधी कमी झाला की यांची ओरड सुरू झाली आहे. शेती व शेतकऱ्यांशी यांना काही देणेघेणे नाही. तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. तिन्ही पक्षांनी मिळून तब्बल एक लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आमचा ठाम आरोप आहे,” असे त्यांनी सांगितले.
“इंडिया आघाडी ही लोकशाहीच्या रक्षणासाठी उभी आहे. पण ज्यांना सत्तेसाठी जनतेने कौल दिला, ते आज काय करत आहेत, हे जनतेने पाहावे,” असे उत्तरही त्यांनी एका प्रश्नाला देताना दिले.