मंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वाटपाचे आदेश
मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या घरांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने ४९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीचे तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत वाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी बुधवारी दिली.
“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे घरांचे नुकसान झालेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे,” असे मंत्री जाधव पाटील म्हणाले. “आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत वेळेवर मिळावी, यासाठी निधी त्वरीत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) मार्गदर्शक तत्वांनुसार विभागनिहाय निधीचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे:

नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांचे पंचनामे पूर्ण होऊन प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरच संबंधित निधी वितरित केला जाईल. या निधीमुळे घरांची तातडीने दुरुस्ती आणि पुनर्बांधणी शक्य होईल,” असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
राज्यात अनेक भागांत अवकाळी पावसामुळे वादळ, पूर, ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने वेळ न दवडता निधीची तरतूद केल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना आगामी संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.