महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई भाजपकडून “शंकेखोराचा कोथळा काढण्याचा” कार्यक्रम

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानांचा वध करताना वापरलेल्या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कार्यक्रमात अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान तर शाहीर नंदेश उमप यांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता दादर येथील स्वा. सावरकर सभागृहात होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी ॲड.शेलार म्हणाले, लंडनमधील संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणण्याचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये वाघनखे तीन वर्षांसाठी येणार आहेत. त्यासाठी मुंबई, नागपूर, सोलापूर, सातारा यासह महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये ही शौर्य पराक्रमी वाघनखे जनतेसाठी खुली असतील. काही शंकेखोर टवाळांनी यावर शंका व्यक्त केली आहे. पण ज्यांच्या मनात, बुद्धीत टवाळक्या करणे याशिवाय दुसरं काही नाही, अशा पक्षातील नेत्यांनी म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी यावर प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. तो कोथळा विचारांचा असेल. ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळत आहे त्यांनी आपल्या बुद्धीत भर घालण्यासाठी कार्यक्रमाला यावे, असे आवाहनही अँड. शेलार यांनी केले.

आदित्य ठाकरेंच्या बाबतीतील प्रश्नांवर उत्तर देताना ॲड.शेलार म्हणाले, झोपी गेलेल्याना उठवता येईल, पण झोपेचे सोंग घेतलेल्याना नाही. आदित्य यांना बुद्धीग्रहण आणि अजून माहिती घेण्याची इच्छा असेल त्यांना सन्मानाने नक्की बोलवू. आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. शंका सहज घेतली जात नाही. विशिष्ट वर्गाची मते येणाऱ्या लोकसभेला, महानगरपालिकेला आपल्याला मिळाली पाहिजेत, यासाठी हे होत आहे. कारण त्यांचे सध्या मतांसाठी लांगूलचालन सुरू आहे. म्हणून अफजलखानाचा कोथळा काढला हे नको, तो इतिहास नको, वापरलेली वाघनखे नको, ती वाघनखे खरी आहेत का? अशी शंका विशिष्ट वर्गाला बरं वाटण्यासाठी उपस्थित केली जाते. हे सगळं नियोजित आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे. आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत. त्याच्यावर कोण काळे लावत नाही. त्याची मोडतोड करत नाहीत. आज डोंगरी आणि पाथमोडी रस्त्यावर न जाणारे घाटकोपरला गुजराती शब्दांवर तोडफोड करायला चालले आहेत. हिंमत आहे तर डोंगरीला जा..! अजूनही तिथे बोर्ड आहेत. तिकडे तोडफोड करा, काळं फासा… विशिष्ट वर्गाची मते हवेत म्हणून तिकडे जायची हिंमत यांच्यात नाही. मात्र हिंदू एकत्र येत असल्याने यांच्या पोटात दुखत आहे. त्यामध्ये विघटन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हिंदू एकतेच्या विरोधात उबाठा गटाचे प्रयत्न असल्याचाही आरोप शेलार यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात