X : @MilindMane70
महाड – राज्य शासनाकडून शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीमधील (Manusmruti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा डाव समोर आल्यानंतर महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यापाठोपाठ आता आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी देखील मनुस्मृतीचे दहन करून शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची क्रांती उलथावून टाकत प्रतिक्रांती करण्याचा शासनाचा डाव खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा आनंदराज आंबेडकर यांनी महाड क्रांती भूमीत दिला.
महाड क्रांतीभूमीमध्ये क्रांती स्तंभाजवळ (Kranti Stambh) काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्या पाठोपाठ आता आनंदराज आंबेडकर यांनी देखील महाडमध्ये दाखल होत मनुस्मृतीची होळी केली.
यावेळी बोलताना त्यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीत बाबासाहेबांनी मनुस्मृति जाळून बहुजनांना आणि माता भगिनींना या जातीयवादी आणि संकुचित विचारसरणीतून मुक्त केले असल्याचे सांगितले. परंतु या देशात पुन्हा एकदा मनुवाद्यांनी डोके वर काढले असून, बाबासाहेबांच्या क्रांतीला उलथवून टाकण्याचे कारस्थान करुन देशात प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. शासनाच्या या कृतीचा त्यांनी निषेध केला.
यावेळी कै. सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांचेही भाषण झाले. त्यांनी बाबासाहेबांनी कशाप्रकारे मनुस्मृति जाळली, त्यावेळी त्यांचेसोबत कोणकोण होते, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
क्रांतिस्तंभावर झालेल्या सभेमध्ये रिपब्लीकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, विश्वनाथ सोनावणे, विनोद मोरे, मारुती जोशी, मिलिंद खांबे यांचीही यावेळी भाषणे झाली. या सभेचे प्रास्तविक बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी, तर सूत्रसंचलन भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले.
या मनुस्मृति दहन आंदोलनात आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नी सौ. मनिषा आंबेडकर यांच्यासह महाड, पोलादपूर, खेड, दापोली, मंडणगड, म्हसळा, श्रीवर्धन तळा, रोहा येथील आंबेडकरी संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.