मुंबई : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर तयार केलेल्या “अवधान” या लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे करण्यात आले.
याप्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, हशू अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ. अमित मिसाळ, सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी आणि पुनम मिश्रा तसेच उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल व निखिल पाटील उपस्थित होते.
“अवधान” या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण आणि समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अध्ययन अक्षमतेची लक्षणे ओळखून मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे, यावरही हा लघुपट भर देतो. तसेच शिक्षक, पालक आणि समाजाने अध्ययन अक्षमतेची शक्यता ओळखून योग्यवेळी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबतही मार्गदर्शन करते. विशेष म्हणजे, या ॲनिमेटेड लघुपटासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे.
या कार्यक्रमादरम्यान विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली.