रेस्क्यू टीम रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू
महाड: पुणे–माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात महिंद्रा कंपनीची थार जीप सुमारे ५०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या माणगाव पोलीस निरीक्षक जयसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू केले असून, चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून माणगावकडे जाणारी थार जीप तीव्र आणि अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची वेळ स्पष्ट झालेली नसली तरी ड्रोन शूटमध्ये दरीत थार जीप आणि मृतदेह दिसून आल्यानंतर शोधकार्य तातडीने सुरू करण्यात आले.
ताम्हिणी घाट हा रायगडमधील वाहतूकदार आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असला तरी धोकादायक वळणांमुळे अपघातांना प्रवण मानला जातो. यापूर्वीही येथे गंभीर अपघातांची नोंद आहे.
या थार जीपमध्ये चारहून अधिक व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, रेस्क्यू टीम दरीत सखोल शोध कार्य करत आहे.
माणगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या अपघाताचा सविस्तर तपास सुरू केला आहे.

