नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीतर्फे शुक्रवार दिनांक २६ आणि शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित दोन दिवसीय ‘लिंगभाव संवेदीकरण कार्यशाळा’ यशस्वीरित्या संपन्न झाली. कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा विद्यापीठातील विविध स्तरांवरील अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभाव समानतेविषयी जाणीव-जागृती निर्माण करणे, कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम २०१३ (पॉश कायदा) बद्दल सविस्तर माहिती देणे व कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी सुसंवादी – निकोप वातावरण निर्मिती करणे हा होता. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यशाळेत पुणे विद्यापीठाच्या स्त्री आणि लिंगभाव शिक्षणशास्त्र विभागाच्या चार सदस्यीय चमूने विषय व सत्रनिहाय मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ संचालिका डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्या श्रीमती हेमलता पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री आणि लिंगभाव शिक्षणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वाती द्याहाडराव, डॉ. स्नेहा गोळे, डॉ. ललित भवरे व प्रा. दीपा टाक, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समितीच्या पीठासन अधिकारी डॉ. माधुरी सोनवणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत होती.
आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी स्त्री – पुरुष यांच्यात समानता निर्माण व्हावी यासाठी कुटुंब ही सर्वात महत्वाची शाळा आहे. प्रत्येक मातेने लहानपणापासून आपल्या मुलांमध्ये सर्वांप्रती समान वागणुकीची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादित केले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांनी आपल्या कार्यशाळा समारोपाच्या भाषणात स्त्री – पुरुष असा भेद न ठेवता सर्वांप्रती समान भावना ठेवण्यासाठी प्रत्यक्षात सकारात्मक कृतीची गरज व्यक्त केली. पूर्वापार भारतीय संस्कृती व समाजात स्त्रीला पुरुषापेक्षा उच्च स्थान देण्यात आल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्या श्रीमती हेमलता पटवर्धन यांनी भारतीय समाजात अधिकार सर्वांना कळतात पण जबाबदारीची जाणीव त्याप्रमाणात नसते अशी खंत व्यक्त केली.
कार्यशाळेत लिंगभाव समानतेचे महत्त्व, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) कायदा २०१३ (पॉश कायदा) : एक ओळख, लिंगभाव समानता आस्थापनेमध्ये व्यवहारात आणावयाची कशी?, विशाखा कायदा, राजस्थानातील भंवरीदेवी न्यायालयीन प्रकरण याविषयीची माहिती देण्यात आली. तसेच व्याख्यान, चर्चासत्र, प्रश्नोत्तरे, प्रत्यक्ष कृती व विविध खेळातून प्रबोधन करण्यात आले. समारोप प्रसंगी सहभागी सदस्य श्री. भाऊसाहेब डांगे, श्रीमती दिपाली तायडे, हृषीकेश पवार, प्रा. राजकुमार ननावरे यांनी कार्यशाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. समिती सदस्य श्री. राजेंद्र वाघ यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन समिती सदस्य सौ. संगीता देशपांडे व डॉ. भागवत चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ. माधुरी सोनवणे यांनी केले. कार्यशाळेसाठी विद्यापीठातील सर्व विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि शेतमजूर उपस्थित होते.