मुंबई: मुंबईत उसळलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आक्रमक शैलीत शरसंधान केले.
“मराठी माणसाला न्याय हवा असेल, तर तो मुंबईतच येणार. न्यायासाठी तो सुरतला किंवा गुवाहाटीला जाणार नाही. कारण मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे,” अशा परखड शब्दांत ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला.
उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला चढविताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. पण आज तेच शिवरायांच्या नावाने शपथ घेतलेले नेते शांत राहून गावी पळून गेले आहेत.” तसेच फडणवीसांना उद्देशून त्यांनी थेट सवाल केला की, “आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लक्ष्य करणारे फडणवीस, तुमचा हा रोख नेमका कोणाकडे आहे?”
याचबरोबर ठाकरे म्हणाले, “आज माझ्या भूमिकेला काही अर्थ नाही असं सांगणारेच कालपर्यंत ‘आरक्षण देऊ’ म्हणून गळाभेटी घेत होते. पण आता तेच गावाकडे पळाले आहेत. आंदोलन करणारे काही दहशतवादी नाहीत, तेही मराठी माणूस आहेत. त्यांच्याही मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि फक्त टोलवाटोलीचं नाटक चाललंय.”
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करत त्यांनी सरकारला इशारा दिला, “जर मराठा समाजाच्या मागण्यांचा तोडगा लवकर निघाला नाही, तर याचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील.”
उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात आपल्या खास आक्रमक शैलीत मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सरकारला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.