नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने देशभरातील शाळांना ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. भुवनेश कुमार यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून, शाळांमध्ये विशेष MBU शिबिरे आयोजित करण्याची विनंती केली आहे. या उपक्रमामुळे जवळपास १७ कोटी विद्यार्थ्यांचे प्रलंबित आधार अपडेट सुलभ होणार आहेत.
UIDAI आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तरित्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) प्लॅटफॉर्मवर आधार MBU स्थिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळांना सहज कळेल की कोणत्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट बाकी आहे आणि ते वेळेत पूर्ण करता येईल.
मुलांचे बायोमेट्रिक अपडेट पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी करणे आवश्यक आहे. हे न केल्यास भविष्यात सरकारी योजनांचे लाभ, शिष्यवृत्ती, तसेच NEET, JEE, CUET सारख्या प्रवेश परीक्षा नोंदणीदरम्यान अडचणी येऊ शकतात. UIDAI ने स्पष्ट केले आहे की शेवटच्या क्षणी होणारी ही धावपळ टाळण्यासाठी पालक व शाळांनी वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे.
UIDAI च्या पत्रात म्हटले आहे की, “शाळांमधील शिबिरांद्वारे प्रलंबित MBU पूर्ण करणे शक्य होईल. UIDAI आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या तंत्रज्ञान पथकांनी UDISE+ अनुप्रयोगात आवश्यक उपाय विकसित केला आहे. आता शाळांना विद्यार्थ्यांचे MBU स्थिती सहज उपलब्ध होईल.”
UDISE+ म्हणजे काय?
युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) ही शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत एक शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे. यात देशभरातील शाळांशी संबंधित आकडेवारी संकलित केली जाते. UIDAI सोबतची ही भागीदारी विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट वेळेत पूर्ण करण्यात मोठे योगदान देणार आहे.