मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी याची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज सायंकाळी नागपूर कारागृहाच्या मागील दरवाजातून त्याची सुटका करण्यात आली.
सन २००७ मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी भरदिवसा झालेल्या हत्याप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हापासून तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता आणि सातत्याने जामिनासाठी प्रयत्नशील होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यासंबंधीच्या अटी शर्ती मुंबई सत्र न्यायालयाने निश्चित केल्यानंतरच सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
जामीन मंजूर झाल्यानंतर आदेशाची प्रत नागपूर कारागृहात प्राप्त झाली आणि लगेचच त्याची सुटका करण्यात आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणण्यात आले, तेथून तो विमानाने मुंबईकडे रवाना झाला.
गुन्हेगारी जगतात गॅंगस्टार म्हणून नावारूपाला आलेल्या गवळीने नंतर राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडूनही आला होता. आता जानेवारी महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सुटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गवळीची अखिल भारतीय सेना पुन्हा मुंबई महापालिकेत उमेदवार उतरवेल का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्याच्या भूमिकेमुळे मुंबईच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होईल, हे येणारा काळ ठरवेल.