आविष्कार संशोधन महोत्सवासाठी आरोग्य विद्यापीठाची निवड फेरी संपन्न
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2025’ संशोधन महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय निवड फेरी यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेतून राज्यस्तरीय महोत्सवासाठी अंतिम संघाची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांचा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. सुनिल फुगारे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रविण घोडेस्वार, डॉ. सूर्यवंशी, डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. संदीप राठोड, श्री. बाळासाहेब पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बंगाळ म्हणाले, “संशोधनाला चालना देण्यासाठी ‘आविष्कार’ ही महत्त्वाची चळवळ आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता तज्ज्ञ मार्गदर्शनाने जागतिक स्तरावर नेण्यासाठी विद्यापीठ आवश्यक सहकार्य करेल.” विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेंटर अंतर्गत ‘दृष्टी’ कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून संशोधनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, निवड झालेल्या संशोधन प्रकल्पांचे जर्नलमध्ये प्रकाशन केले जाईल, जेणेकरून संशोधनाला व्यापक व्यासपीठ मिळेल.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, सहा संवर्गांमध्ये 207 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून विद्यापीठ संशोधनासाठी आवश्यक निधी व व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
स्पर्धेत वाणिज्य, व्यवस्थापन, वैद्यक, विज्ञान, अभियांत्रिकी, मानव्यविद्या, शेती व पशुसंवर्धन अशा सहा संवर्गांमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात आली. नाशिक, पुणे, नागपूर, अहिल्यानगर, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पालघर, परभणी आदी ठिकाणच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. प्राथमिक फेरी मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे झाली. त्यात 925 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यापीठस्तरीय फेरीसाठी 207 स्पर्धकांची निवड करण्यात आली, यामध्य 102 पदवीपूर्व, 67 पदव्युत्तर आणि 38 संशोधक व शिक्षक सहभागी झाले.
निवड झालेले संघ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 28 जानेवारीपासून होणाऱ्या राज्यस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे व डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

