नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान अवमान प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. स्थगन प्रस्ताव स्विकारून चर्चेची मागणी नाकारल्याने संतप्त महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी तालिका सदस्यांची नावे जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसचे नितीन राऊत यांनी परभणी प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने तातडीने चर्चा घ्यावी अशी मागणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही आंदोलनातील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस लाठीमारात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळ संतप्त असून महाराष्ट्र पेटत जाईल, अशी चेतावणी देत चर्चेचा मुद्दा लावून धरला.
यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रकरण गंभीर असल्याचे मान्य केले, मात्र स्थगन प्रस्तावाऐवजी चर्चा नियम-१०१ अंतर्गत होईल, असे स्पष्ट केले. मात्र, नितीन राऊत यांनी महाराष्ट्र सध्या जळत असल्याकडे लक्ष वेधले. “काल शोक प्रस्तावामुळे चर्चा झाली नाही. नांदेड आणि पुणे बंद आहे,” असे सांगून त्यांनी चर्चेची मागणी आजच करण्याची विनंती केली. मात्र अध्यक्षांनी ती नाकारत औचित्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू केली.
यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बीड आणि परभणी प्रकरणावर चर्चा न झाल्याने सभात्यागाची घोषणा केली. त्यानंतर सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहाबाहेर पडत सरकारविरोधात निषेध नोंदवला.