X: @therajkaran
विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनी मंगळवार दि. 26 मार्च 2024 रोजी जे. पी नाईक भवन, मुंबई विद्यापीठ परिसर, कलिना, सांताकृझ, मुंबई येथे संध्याकाळी चार वाजता सुप्रसिद्ध कवि, गीतकार, लेखक,दिग्दर्शक व अभिनेता स्वानंद किरकिरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पांसह विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम ‘ विमलताई गाडेकर स्मृती सोहळा’ समितीने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला विमलताई गाडेकर यांच्यावर प्रेम करणारे राज्यभरातील त्यांचे चाहते उपस्थित राहणार आहेत. यात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, सिनेसृष्टीतील मान्यवर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक गण आणि निवडक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.
सिने साहित्यिक स्वानंद किरकिरे यांच्यासोबत जेष्ठ संपादक शाम पेठकर संवाद साधणार आहेत. लोकप्रिय अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि कवि, रंगकर्मी व शिक्षण तज्ज्ञ डॉ. मंगेश बनसोड यांचा ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मान’ या पुरस्काराने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
मागच्या वर्षीपासून सुरु झालेल्या ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मान’ या सत्काराचे मानकरी होते, महावितरण येथे सौर प्रकल्प विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या श्रीमती अर्चना राणे-चोपडे, मुंबई विद्यापिठाच्या जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन लिमिटेड येथे संचालक (फायनान्स) मुंबईचे निखिल मेश्राम. या सर्वांचे प्रेरणास्थान, स्मृतिशेष प्रा. विमलताई गाडेकर यांच्या आदर्शांना, आशिर्वादांना, शिकवणुकींना सार्थसिद्ध झाल्या बद्दल मानपत्र देण्यात आले होते.
विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आता पर्यंत अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पी एच डी करित आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
प्रा. विमलताई गाडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनी चंद्रपूर येथे प्रा. विमलताई गाडेकर यांचे अप्रकाशित साहित्य ‘कोवळे कंच’ आणि त्यांच्या आठवणी जागविणारे ‘ विमल ताई गाडेकर-व्यक्ती आणि वाड.मय’ या दोन संग्रहांचे प्रकाशन आणि निमंत्रीतांचे कवि संम्मेलन आयोजित केले होते.
गत वर्षी द्वितीय स्मृती दिनी पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत विमलताईंच्या कार्यांचे स्मरण करण्याबरोबरच, प्रा. विमलताई गाडेकर लिखित सुशिल सहारे दिग्दर्शित आणि ॲड. चौताली बोरकुटे- कटलावार यांनी अभिनय केलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘चंदनी दरवळ’ या अभिनाट्याचे सादरिकरण झाले होते.
प्रा. विसुभाऊ बापट यांचा विश्व विक्रमी जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभव ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम देखील सादर झाला होता.
प्रा. विमलताई गाडेकर यांची कन्या तसेच पालघरच्या जिल्हा माहिती अधिकारी अर्चना शंभरकर आणि मुलगा सिने अभिनेता जयंत गाडेकर यांनी ही माहिती दिली आहे.