कराड : माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केलेले दुबार मतदार नोंदणीचे आरोप सरळसरळ असत्य आहेत. हे आरोप म्हणजे कराड दक्षिणेत झालेल्या मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठी भाजपने रचलेली केवळ खोटी कथा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
चव्हाण म्हणाले, “मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. भाजपकडून केलेले आरोप हे केवळ पृथ्वीराज चव्हाणांचे (Prithviraj Chavan) नाव घेऊन झालेली मतांची चोरी (Vote Chori) लपवण्यासाठी आहेत.”
या पत्रकार परिषदेला गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “दुबार मतदार नोंदणी आणि बोगस मतदान यात फरक आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांची दुबार नोंदणी झाल्याचे लक्षात येताच आम्ही निवडणूक आयोगाकडे योग्य अर्ज करून नाव कमी करण्याची कार्यवाही केली होती. तरीसुद्धा मतदार यादीत दुबार नावे राहिली, ही चूक आयोगाची (election commission) आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, मतदार यादीतील घोळ हा मूळ प्रश्न असून ती दोषमुक्त होणे आवश्यक आहे. “परंतु निवडणूक आयोगावर टीका केली की तात्काळ भाजप पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. यावरूनच निवडणुकीदरम्यान नेमके काय प्रकार झाले ते स्पष्ट होते.”
इंद्रजीत चव्हाण पुढे म्हणाले, “माझ्या वयात व मतदार यादीत नोंद झालेल्या वयात तफावत आहे. जर आमची नोंदणी नजीकची असेल तर ती सिद्ध करावी. तसेच जर खरोखरच दुबार मतदान झाले असेल तर त्याचे ठोस पुरावे सादर करावेत. केवळ राजकीय फायद्यासाठी आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे होय.”