मुंबई : महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच धर्मद्वेष व भाषाद्वेष रोखण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज आहे, असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.
नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाने मतदार विकत घेऊन आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटून निवडणुका जिंकल्या, असा गंभीर आरोप तिवारी यांनी केला. आता मतदारांना विकत घेण्याऐवजी थेट विरोधी पक्षांचे उमेदवारच विकत घेण्याचा ‘राहुल नार्वेकर पॅटर्न’ सुरू झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.
तिवारी म्हणाले, “भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक लोकशाहीला सत्ताधारी पक्ष हळूहळू हुकूमशाहीकडे नेत आहेत. भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करणारे ओवेसी आणि राज ठाकरे हे निवडणुकांमध्ये हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी वाद उभे करून महायुतीला फायदा करून देत आहेत.”
येत्या महानगरपालिका निवडणुकीत लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष
तिवारी यांनी ठाकरे बंधूंवरही टीका केली. “विदर्भात २०२५ मध्ये दररोज सरासरी चार मराठी शेतकरी आत्महत्या करत असताना ठाकरे बंधूंना मराठी माणूस का आठवत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम विदर्भात मागील वर्षी २००९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मात्र त्याकडे एकदाही ढुंकून पाहिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
धर्म-भाषेच्या नावावर राजकारण
मुंबईत मराठी माणसाचे स्थलांतर होत असताना मौन बाळगणारेच आता मराठी नावाने, नमाज-अजानच्या मुद्द्यावर मुस्लीम समाजाला त्रास देण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भाजप व राज ठाकरे यांचे धर्मद्वेष व भाषाद्वेषाचे राजकारण रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत काँग्रेसलाच मतदान करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.
अडाणी-अंबानी विरोधावर प्रश्नचिन्ह
किशोर तिवारी म्हणाले, “अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचणारे आणि अडाणींकडून देणग्या घेणारे ठाकरे बंधू गुजराती विरोधाचे नाटक करत आहेत. हा सगळा दिखाऊपणा आहे.”
गेल्या तीन वर्षांत मुंबईतील हजारो एकर जमीन अडाणी समूहाच्या घशात जात असताना ठाकरे बंधूंचे मौन हे संशयास्पद आहे, असे ते म्हणाले.
सर्व समाजासाठी काँग्रेसच पर्याय
तिवारी यांनी सांगितले की, धर्म, भाषा आणि जातीच्या नावावर राजकारण करून लोकशाही कमकुवत करणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे.
सर्व धर्म, भाषा व जातींच्या मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

