मुंबई – महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय हा मराठी विरोधी असून, तो त्वरित रद्द न केल्यास काँग्रेस पक्ष सडकून विरोध करेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
शनिवारी मुंबईतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “भाजप आणि संघाचा हेतू म्हणजे संविधानातील आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांचा अस्त करून केवळ हिंदीच लादणे. पण काँग्रेस मराठीचा गळा घोटू देणार नाही. हिंदीचा अपमान न करता आम्ही तिच्या सक्तीला विरोध करतो. मराठी ही आमची भाषा नसून जीवनशैली आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयाविरोधात काँग्रेसने साहित्यिकांना पत्र पाठवले असून, काही संस्था आणि संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. “हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही, तर संस्कृतीचा लढा आहे. त्यामुळे यासाठी कोणाचं निमंत्रण लागणार नाही. आम्ही सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, “गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच ती का? एकच पक्ष असूनही दोन राज्यांत वेगवेगळ्या धोरणांचा आधार कसा घेतला जातो? भाजपचा हा दुटप्पीपणा आहे.”
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत, ‘बंच ऑफ थॉट्स’ या संघप्रेरणांवरील पुस्तकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.