मुबंई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray group) मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच आता ठाकरें गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या (Shivsena) निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 19 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत फूट पाडली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली., शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार, याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते. अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे. शिवसेना कुणाची याचा येथे 19 जुलैला फेसला होणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच (Vidhan Sabha Election 2024) खरी शिवसेना नेमकी कुणाची? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.या याचिकेवरील सुनावणी देखील १९ जुलैला होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि महायुतीला फटका दिला.पक्षाचे चिन्ह, नाव नसतानाही ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळाल्या. सत्ता, यंत्रणा, पक्ष, चिन्ह असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या.. ठाकरेंच्या या लोकसभेच्या यशानंतर शिवसेना कोणाची याबाबत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.