मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन | सर्व राज्यांतील महिला आयोगांचा सहभाग
मुंबई : महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवाद’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडेंट येथे होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.
या शक्ती संवादाबाबत माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने देशभरात महिला सक्षमीकरणासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध राज्यांत जाऊन महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण, सुरक्षा आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘शक्ती संवाद’ आयोजित केले जात आहेत. याच मालिकेतील पुढचा टप्पा 22 आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणार आहे.
यावेळी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावरील कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर आधारित राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
’शक्ती संवाद’ची रूपरेषा
दोन दिवसांच्या या संवादात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर परिसंवाद होतील:
• देशातील महिला आयोगांसमोरील आव्हाने आणि संधी
• मानवी तस्करीविरोधी कायदे व त्यांची अंमलबजावणी
• विविध संस्थांमधील समन्वय
• आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सायबर सुरक्षा
• राज्यघटना निर्मितीत महिलांचे योगदान
• महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य
• कामाच्या ठिकाणी सुरक्षा व लिंग समानता
याशिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाने स्थापन केलेल्या सल्लागार समितीचे सदस्य, ज्यात महिला विषयक कायद्यांवर तज्ज्ञ सूचना देणारे मान्यवरांचा समावेश आहे, तेही या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अभ्यासक या संवादात सहभाग घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान देणार आहेत.