नागपूर : हिवाळी अधिवेशनात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत करारी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “योजना सुरू होताच तिला ‘फसवी घोषणा’ म्हणणारे तुम्हीच. इतकेच नाही, योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले तेही तुमचेच नेते. वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते का? मग आज कोणत्या तोंडाने ‘लाडक्या बहिणी’चा मुद्दा काढता?”
त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला.
शिंदे यांनी स्पष्ट केले की विरोधकांच्या प्रयत्नांना हायकोर्टानेच फटकारले होते. ते म्हणाले, “महिलांचा लाभ थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही तो होऊ दिला नाही.” आचारसंहितेतही लाभार्थ्यांना अडथळा येऊ नये म्हणून शासनाने अॅडव्हान्स निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
“लोकांचे पैसे लोकांनाच देण्याची दानत आम्ही दाखवली. तुमच्या सरकारकडे कधी नव्हती,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

