४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी तैनात
महाड: येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यात पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, यासाठी ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी तसेच अतिरिक्त विशेष पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात महाड तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण यांसाठी निवडणूक होत आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
निवडणुकीपूर्वीच तालुक्यातील दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन ठिकाणी पोलिसांकडून संचलन करण्यात आले असून, शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश देण्यात आला आहे.
महाड तालुक्यात एकूण २०३ मतदान केंद्रे असून, महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी असे दोन दिवस राहणार आहे.
बंदोबस्ताचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
• एमआयडीसी पोलीस ठाणे: १०५ होमगार्ड, ६५ पोलीस अंमलदार
• महाड शहर पोलीस ठाणे: २१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार, १२ अधिकारी
• महाड तालुका पोलीस ठाणे: १४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार, ५ अधिकारी
या तीनही पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक प्लाटून तैनात असून त्यामध्ये १ अधिकारी व २३ पोलीस अंमलदार, तसेच १ सेक्शनमध्ये ८ पोलीस अंमलदार कार्यरत राहणार आहेत.
महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी पोलिसांसोबतच गावपातळीवरील पोलीस पाटील यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

