मुंबई: राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला.
कार्यक्रमाचे वेळापत्रक : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध : 8 ऑक्टोबर 2025, हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत : 8 ते 14 ऑक्टोबर 2025. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध : 27 ऑक्टोबर 2025
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या याद्यांमधील नावे व पत्ते कायम ठेवले जातील. याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यांमध्ये बदल करणे ही कार्यवाही या टप्प्यावर केली जाणार नाही.
तथापि, हरकती व सूचनांच्या आधारे लेखनिकांकडून झालेल्या तांत्रिक चुका — जसे की मतदाराचा चुकीचा विभाग किंवा गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव न दिसणे — या संदर्भात दुरुस्त्या केल्या जातील.