X : @vivekbhavsar
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) याच्याविरुद्ध कल्याण पूर्व मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फायदा उचलत ही जागा भाजपकडून (BJP) खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने (Maharashtra Vikas Aghadi) कंबर कसली आहे. मात्र ही जागा काँग्रेसला सोडायची की उद्धव सेना यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. तशात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने देखील या मतदारसंघावर दावा करण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीसाठी सोप्या असलेल्या या मतदारसंघात जागावाटपातूनच (seat sharing) मतभेद होतील, असे संकेत आहेत.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाड (Shiv Sena leader Mahesh Gaikwad) यांच्यावर उल्हासनगर येथील हील लाईन पोलीस ठाण्यात पाच राऊंड फायर (firing in police station) केले होते. याची कबुलीही गायकवाड यांनी दिली होती. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
कल्याण – डोंबिवली या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) बालेकिल्ल्यात गायकवाड यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविरुद्ध नाराजी आहे. यंदा गायकवाड निवडणूक लढवू शकत नसले तरी त्यांच्या पत्नीने निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. मात्र, गायकवाड यांच्या पत्नीला भाजप आणि संघ (RSS) परिवारातून विरोध असून हे दोन्ही घटक निवडणुकीत छुप्या पद्धतीने गायकवाड यांच्याविरोधात प्रचार करतील, अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेनाही (Shiv Sena) निवडणुकीत गायकवाड यांचा हिशोब चुकता करण्यासाठी तयारी करून बसली आहे. महायुतीतील (Mahayuti) या नाराजीचा आणि अंतर्गत कुरबुरीचा फायदा उचलण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) कंबर कसली आहे.
कल्याण पूर्व या मतदारसंघात (Kalyan East Assembly constituency) यापूर्वी धनंजय बोडारे यांनी दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवली आहे. बोडारे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) तिकीट मागण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे गेले 24 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले माजी नगरसेवक सचिन पोटे (Sachin Pote) यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
उल्हासनगरचे रहिवासी असलेले बोडारे हे अवघे दहावी उत्तीर्ण असून त्यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर दुसरीकडे सचिन पोटे हे उच्चशिक्षित असून मतदारसंघात खास करून युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. केवळ गणेशोत्सव (Ganesh Festival) आणि दहीहंडी (Dahi Handi) यापुरता मर्यादित न राहता सचिन पोटे यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. नागरिकांना कधीही उपलब्ध असणारा नेता अशी सचिन पोटे यांची ओळख आहे. अडल्या- नडलेल्याला मदत करणे, रुग्णांच्या पाठीशी उभे राहून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे या आणि अशा कार्यामुळे सचिन पोटे यांची प्रतिमा गायकवाड आणि बोडारे यांच्या तुलनेत उजवी आहे.
जागा वाटपात महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडली तर सचिन पोटे हे सक्षम उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. भाजप आणि संघ परिवार देखील बोडारे किंवा गायकवाड यांच्या पाठीशी उभे न राहता सचिन पोटे यांना आतून मदत करतील, असा दावा संघाच्या एका स्थानिक नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
“कल्याण – डोंबिवली (Kalyan – Dombivali) हा आमचा संघाचा बालेकिल्ला आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाची प्रतिमा बिघडवली आहे. आमच्या पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसेल तर आम्ही दुसऱ्या चांगल्या सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू”, अशी भूमिका संघाच्या या नेत्याने व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला आमचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे, याकडेही संघाच्या या नेत्याने लक्ष वेधले.
काँग्रेस आणि उद्धव सेनेत या जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच शरद पवार यांच्या पक्षाने (NCP- SP) देखील या मतदारसंघावर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामुळे सचिन पोटे यांना पक्ष उमेदवारी देणार नसेल तर पोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची तयारी आमच्या पक्षाने केली आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली.
“कल्याण पूर्व ही महाविकास आघाडीसाठी अत्यंत भुसभुशीत जमीन आहे, राज्यातील शिवसेना -भाजप – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार उलथून टाकण्यासाठी हीच संधी आहे, राज्यात महायुती सरकारच्या विरोधात वातावरण आहे आणि म्हणून आमच्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. काँग्रेस आणि उद्धवसेना कल्याण पूर्व या जागेबाबत घोळ घालणार असतील तर आमची उमेदवार द्यायची तयारी आहे,” असे राष्ट्रवादीच्या या नेत्याने सांगितले.
उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता? - Rajkaran
September 20, 2024[…] […]