X: @therajkaran
मुंबई : महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे पिठासनावर होते. आज पहिल्या दिवशी एकूण सदस्यांपैकी 173 जणांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. इव्हीएमच्या विरोधी भूमिका असल्याचे जाहीर करून महाविकास आघाडी सदस्यांनी मात्र बहिष्कार तंत्र वापरून सभात्याग केला.
विशेष अधिवेशनाची सुरुवात वंदेमातरम पाठोपाठ राज्यगीताने झाली. सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी अनेक सदस्यांनी भगवे फेटे बांधले होते. काही महिला सदस्यांचाही त्यामध्ये समावेश होता. महायुती सदस्य जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत होते. हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी राज्यपाल महोदयांनी नियुक्ती केल्याचे पत्र वाचून दाखवले तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड सोमवारी 9 डिसेंबर रोजी होईल असा संदेशही वाचून दाखविला. त्यानंतर शपथविधीस प्रारंभ झाला.
शपथविधिच्या क्रमानुसार सदस्यांच्या नावाची घोषणा होत होती. चैनसुख संचेती यांच्या पासून शपथविधीस प्रारंभ झाला. पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अनुक्रमे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी ईश्वरसाक्ष तर अजित पवार यांनी गांभिर्यपूर्वक शपथ घेतली.
दिलीप वळसे पाटील यांच्यानतर महाविकास आघाडीचे नेते कॉंग्रेसचे नाना पटोले यांचे नाव होते. मात्र त्याचवेळी एकामागोमाग एक भराभर सर्व विरोधी बाकावरील सदस्य सभागृहाबाहेर निघून गेले. मारकडवाडी गावक-यांनी इव्हिएम विरोधात आवाज उठवला, त्याला समर्थन म्हणून आज शपथविधीसाठी सहभाग घेतला नाही अशी भूमिका नंतर महाआघाडी नेत्यांकडून जाहीर करण्यात आली.
गिरीश महाजन, राम कदम, सरोज हिरे, प्रशांत ठाकूर, प्रसाद अडसड, नितेश राणे, सुधीर गाडगीळ या सदस्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली. नवाब मलिक यांच्या कन्या अणुशक्ती नगर, मानखूर्द येथून विजयी झालेल्या सना मलिक यांनी मराठीतून अल्लासाक्ष शपथ घेतली. नांदेड, भोकरदन येथून विजयी श्रीजया अशोक चव्हाण यांनी आपले आजोबा शंकरराव चव्हाण यांचा शपथ घेताना महाराष्ट्राचे भगिरथ असा उल्लेख केला.
आज एकूण 173 सदस्यांनी शपथ ग्रहण केली. त्यानंतर सभागृहाची बैठक स्थगित केल्याचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी जाहीर केले.