मुंबई : बीड, नांदेड, आणि हिंगोली येथे बोगस औषधांचा साठा सापडल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, शासनाने दोषींना अभय देत त्यांच्या परवाने रद्द करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. ही कृती म्हणजे “कळतं पण वळत नाही” अशी अवस्था निर्माण करणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एड अमोल मातेले यांनी व्यक्त केली आहे.
बनावट औषध पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी शासनाने त्यांना अभय देणे म्हणजे या गुन्हेगारांना मोकळे रान देणे आहे.औषध पुरवठा व्यवस्थेत शासनाचा असा हलगर्जीपणा असेल, तर नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात राहणार.
सरकारच्या अनिर्णयामुळे औषध क्षेत्रातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे. “चिखलात कमळ फुलतं, पण इथं चिखलच चिखल आहे!”
बनावट औषधांचा साठा सापडूनही कारवाईला विलंब म्हणजे भ्रष्टाचाराचे जाळे अधिक गडद होत असल्याचा पुरावा आहे.
दोषी व्यापाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावेत, बोगस औषधांची चौकशी करून मोठे रॅकेट उघडकीस आणावे, अशी मागणी त्यानी केली आहे.
यामागील शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी केली आहे.
बनावट औषधे पुरवणाऱ्यांना अभय देणे म्हणजे “कुत्र्याला दही लावून ठेवणे” असेच आहे. अशा प्रकारची हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर गंभीर परिणाम करू शकतो. दोषींवर वेळेत कारवाई झाली नाही, तर “शिमगा साजरा होण्याआधीच होळी पेटेल!”
जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही! असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी दिला.