आंध्र प्रदेशातील अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात चित्र आणि कलाप्रेमींना नुकताच चित्रकलेचा अप्रतिम कलाविष्कार पाहायला मिळाला. सर जेजे कला महाविद्यालय, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स आणि अप्रत्यक्ष कर विभाग यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात पलासमुद्रम राष्ट्रीय चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील २५ पेक्षा अधिक ख्यातकीर्त कलाकार या निमित्ताने एकत्र आले होते. या कार्यक्रमाला सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईनचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन अत्यंत दिमाखदार आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले.
१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान हे चित्रकला शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला.
शिबिराचे आयोजन सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईनचे कुलसचिव शशिकांत काकडे आणि कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शशिकांत काकडे यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या शिबिरादरम्यान देशभरातील नामवंत कलाकारांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने भारताच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा साकारला. कलाकारांच्या सर्जनशीलतेचे अप्रतिम दर्शन या माध्यमातून घडले. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधील प्रथितयश कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृतींनी शिबिराची उंची वाढवली.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे मुख्य महासंचालक गेंगोगदीन पानमेई यांनी आपल्या भाषणात सांगितले, “या चित्रकला शिबिरामुळे कला आणि सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन घडले असून, या कलाकृती आमच्या आवाराचा अविभाज्य भाग बनतील. यामुळे या परिसरात कायमस्वरूपी कला आणि सौंदर्याचे अधिष्ठान निर्माण झाले आहे.”
सर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या कलाशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. गणेश तरतरे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “पलासमुद्रम राष्ट्रीय चित्रकला शिबिर हा केवळ कला उत्कृष्टतेचा उत्सव नाही, तर सर जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्समधील दृढ सहकार्यास अधोरेखित करणारा उपक्रम आहे. या शिबिरात तयार झालेल्या कलाकृती प्रशिक्षार्थी आणि चित्रप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतील.”
तरतरे पुढे म्हणाले की, “या उपक्रमाच्या माध्यमातून पलासमुद्रमला भविष्यात कला आणि बौद्धिक प्रेरणेचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे.”
या शिबिरामुळे कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा अवर्णनीय संगम साधला गेला असून, पलासमुद्रम परिसर चित्रकलेच्या नवनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.