मुंबई: राज्यातील पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधीच्या योजनांसाठी सखोल आणि नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.
मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी आणि हवा प्रदूषण नियंत्रण, नदी आणि तलाव संवर्धन यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. राज्यातील पर्यावरणीय उपक्रमांना गती देण्यासाठी राज्य, जिल्हा आणि ग्रामपातळीवर समित्या स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पर्यावरणपूरक वातावरण निर्माणासाठी पुढील कृती:
• राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना प्रभावीपणे राबविणे.
• सागर तटीय विशेष राखीव क्षेत्राचे नियमन करणे.
• स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे अंमलात आणणे.
• पर्यावरण क्लब आणि पाणथळ जागांचे संवर्धन प्रकल्प राबविणे.
• महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्राची स्थापना.
• सृष्टीमित्र पुरस्कार आणि माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांना गती
बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धन विभागाचा देखील सखोल आढावा घेतला. राज्यातील पशुधन संवर्धन, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आणि सदस्य सचिव अविनाश ढाकणे उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी विभागाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन, भविष्यातील योजनांची माहिती सादर केली.