मुंबई : मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकामांवर निर्बंध लावून मुंबईच्या विकासाच्या चाकाला अडथळा आणला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.
ॲड. अमोल मातेले म्हणतात की, नावाला भूषण पण कामाला शून्य’ अशी सध्याची स्थिती आहे. कायदेशीर नियमांचे पालन न करणाऱ्या विकासकांवर दंड आकारणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र, आयुक्तांनी हे सोडून थेट बांधकामच बंद करून शहराच्या प्रगतीवर ब्रेक लावला आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट आले आहे.
आयुक्तांच्या या धोरणाचे वर्णन ‘तोंडाला राम राम आणि पाठीमागे छुरी’ असे करता येईल, अशीही टीका त्यांनी केली आहे. प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे, परंतु ‘गाढवाला गाडीत जोडलं की ते घोडा होत नाही,’ हेही लक्षात ठेवायला हवे. विकासाच्या नावाखाली संपूर्ण बांधकाम बंद करणे म्हणजे ‘मिठाचा खडा पाण्यात टाकून समुद्र गोड करण्याचा प्रयत्न’ आहे, असे अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
श्री. गगराणी यांना सांगायचे आहे की, ‘भूषण’ हे केवळ नावानेच नव्हे, तर कामानेही असायला हवे. नियमांचे पालन सुनिश्चित करून बांधकामे सुरू ठेवण्याचा आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा तोडगा काढणे हे तुमचे खरे कर्तव्य आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ॲड.अमोल मातेले यांनी स्पष्टपणे मागणी केली की, मुंबईच्या प्रगतीला खीळ घालणारे निर्बंध हटवून, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा दृष्टीकोन स्वीकारला जावा. कारण ‘विकासाचा रथ थांबला, तर भविष्याला ब्रेक लागतो.’
मुंबईसाठी फक्त गाजावाजाची गरज नाही, तर ठोस आणि प्रगतीशील निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा मुद्दा अधिक तीव्रतेने जनतेसमोर मांडू, असा इशारा मातेले यांनी दिला आहे.