मुंबई: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी थकीत RTE शुल्काचा परतावा तातडीने करण्यासह सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
डॉ. तायडे पाटील यांनी सांगितले की, राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी त्यांनी पुढील मागण्या केल्या:
1. RTE शुल्क परतावा: राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा थकीत RTE शुल्क परतावा त्वरित देण्यात यावा.
2. अनधिकृत शाळांवर कारवाई: राज्यातील अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ बंद करण्यात यावे.
3. मान्यतेसाठी निकष शिथिल करावेत: नवीन शाळा सुरू करण्यासाठी आणि दर्जावाढीसाठीचे कठोर निकष शिथिल करण्यात यावेत.
4. शिक्षक प्रशिक्षण: इंग्रजी माध्यमातील शाळांच्या शिक्षकांना शासनामार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
5. लोकप्रतिनिधींचा निधी: इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी मिळण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी.
6. शालेय सुविधांचा पुरवठा: इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहार योजना लागू करावी.
डॉ. तायडे पाटील म्हणाले की, “या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास भाग पाडले जाऊ.”
परिषदेत मान्यवर उपस्थित
या पत्रकार परिषदेला संघटनेचे महासचिव डॉ. विनोद कुलकर्णी, विधी सल्लागार अॅड. सुधीर महाले, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पालवे, ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा सचिव नरेश कोंडा आदी मान्यवर उपस्थित होते.