अन्यायग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली
धुळे – बजाज फायनान्सच्या प्रतिनिधीने केलेल्या मोबाईल घोटाळा प्रकरणात बजाज फायनान्सच्या वरिष्ठ अधिकार्यांसह कंपनीलाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करत फसवणूक झालेल्या नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी दैनिक श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील आणि ज्येष्ठ नेते हिरामण गवळी उपस्थित होते.
गोरगरीब मजुरांच्या नावावर लाखोंचे कर्ज
धुळे शहरातील कष्टकरी आणि अल्पशिक्षित नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर लाखोंचे कर्ज मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा मोबाईल कर्ज घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. काही जणांना अटक झाली असली तरी मोबाईल विक्रेते आणि मोठे गुंतलेले अधिकारी अद्यापही मोकाट फिरत आहेत. फसवणूक झालेल्या नागरिकांना आता बेकायदेशीर कर्जाचे हप्ते फेडण्याचा मानसिक ताण सहन करावा लागत आहे, त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फसवणूक कशी केली गेली?
फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, बजाज फायनान्स कंपनीच्या FOS (फील्ड ऑपरेशन्स स्टाफ), मोबाईल दुकान मालक, सॅमसंग प्रमोटर, बजाज फायनान्सचे सेल्स ऑफिसर आणि विभागीय प्रमुख यांनी संगनमताने ही मोठी फसवणूक घडवली.
• ग्राहकांकडून OTP मिळवून त्यांच्या नावावर खोट्या फायनान्स फाइल्स तयार करण्यात आल्या.
• सामान्यपणे एका व्यक्तीला एकाच वेळी एक मोबाईल आणि तोही ठराविक टप्प्यांमध्ये फायनान्स करता येतो. मात्र, एका व्यक्तीच्या नावावर एका दिवसात ₹1,25,000 किमतीचे ३ मोबाईल उचलण्यात आले, यावरून हा घोटाळा उघड झाला.
• बजाज फायनान्सच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही या फसवणुकीला अप्रत्यक्ष मान्यता दिली असल्याचा आरोप आहे.
फसवणूक झालेल्या नागरिकांची यादी
या घोटाळ्यात फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये राजेश बाळासाहेब गायकवाड, कल्पेश राजेश गायकवाड, मोनिका ईश्वर दरेकर, निलेश बापू अमृतकर, गणेश किसन रासकर, मंदाकिनी सुरेश रासकर, संतोष राजेंद्र मेहेत्रे, गोरख भाऊराव चव्हाण, प्रकाश शिवदास सुर्यवंशी, शाना हरी बागले, संतोष राजाराम भोपे, ज्ञानेश्वर प्रकाश रगडे आणि इतर अनेक नागरिकांचा समावेश आहे.
बजाज फायनान्सला सहआरोपी करा – नागरिकांची मागणी
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बजाज फायनान्सच्या अधिकार्यांनीच हा घोटाळा घडवून आणला असून त्यांनीच फसवणुकीस चालना दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात बजाज फायनान्सलाही सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे पीडित नागरिकांचे सिबिल स्कोअर खराब झाले असून भविष्यात त्यांना कोणत्याही फायनान्स कंपनी किंवा बँकेकडून कर्ज मिळणार नाही.
गोल्डन शॉपच्या मालकाची धमकी – “आमचे काही होणार नाही!”
या घोटाळ्यात राजू शिवाजी पाटील या पेपर विक्रेत्याचीही फसवणूक झाली असून गोल्डन शॉपचा मालक गिरीष आहुजा याने त्याला धमकी दिल्याचा आरोप आहे.
राजू पाटील म्हणाले, “गिरीष आहुजा रोज माझ्याकडून पेपर घेतो. मी त्याला विचारले की, तुम्ही आमच्या नावावर फायनान्स काढून मोबाईल घेतलेत, आम्ही ते कर्ज कसे फेडणार? तेव्हा गिरीष आहुजा म्हणाला – ‘तुमच्याने जे होईल ते करा, आमचे काहीही होणार नाही. आम्ही अटकपूर्व जामीन घेऊ.’ शिवाय त्याने शिवीगाळही केली.”
पीडित नागरिकांना न्याय मिळेल का?
फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने सर्व मोबाईल ट्रॅक करून संबंधित मोबाईल विक्रेते आणि फायनान्स कंपन्यांकडून पैसे वसूल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हा घोटाळा फक्त स्थानिक पातळीवरच मर्यादित नाही, तर तो फायनान्स कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.