महाराष्ट्र ताज्या बातम्या

मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी

मुंबई : प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेला शेवटच्या क्षणी मुंबई पोस्टलकडून अवघ्या २ गुणांनी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना बाद फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई पोस्टलचा संघ उपांत्य फेरीत मिडलाईन अ‍ॅकॅडमीशी भिडेल तर दुसरा उपांत्य सामना ठाणे महानगरपालिका आणि रुपाली ज्वेलर्स यांच्यात होईल.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कबड्डीप्रेमींना आगळावेगळा थरार पाहायला मिळाला. साखळीत दोन्ही सामने जिंकणारे मुंबई महानगर पालिका, आयएसपीएल आणि मुंबई बंदर हे तिन्ही संघ बाद फेरीत बाद झाले आणि केवळ एक सामना जिंकून बाद फेरीत गाठणार्‍या चारही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोस्टल यांच्यातील सामना कमालीचा चुरशीचा झाला. मनमीत कुमार आणि विशाल कुमार यांच्या जोरदार खेळाच्या जोरावर मुंबई पालिकेने मध्यंतराला २१-१९ अशी छोटीशा का होईना आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात अभि भोजने आणि मयुर शेख यांनी मुंबई पालिकेची आघाडी मोडीत काढली आणि शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या संघर्षात ४०-३८ अशी बाजी मारली. रुपाली ज्वेलर्सच्या सतपाल कुमावत आणि खेमचंद भोई यांनी सुसाट खेळ करत सुरुवातीपासूनच संघाला आघाडीवर ठेवले. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसला आपली पिछाडी कमी करता आली नाही. परिणामता अत्यंत नीरस आणि कंटाळवाण्या झालेल्या सामन्यात रुपाली ज्वेलर्सने ४३-२३ असा सहज विजय नोंदविला.

स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून आघाडीवर असलेल्या आयएसपीएल संघाने बाद फेरीच्या सामन्यात कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. रायगडच्या मिडलाइन अ‍ॅकॅडमीच्या धीरज बैलमारे आणि प्रफुल्ल झावरेने वेगवान चढाया-पकडीचा खेळ करत सुरुवातच अशी केली की मध्यंतरालाच २९-११ अशी विजयी आघाडी घेत आयएसपीएलचा पराभव निश्चित केला. त्यानंतर मिडलाईनने आपल्या खेळात बचावात्मकता आणत आयएसपीएलला आपल्या गुणांचा आकडा फार वाढवू दिला नाही. त्यामुळे मिडलाईनने ४६-२७ अशा फरकाने आयएसपीएलचा धुव्वा उडवत जेतेपदाच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. ठाणे महानगरपालिकेने मुंबई बंदरचे आव्हान ३९-३१ अशी परतावून लावत अंतिम चार संघात मजल मारण्याची किमया दाखवली.

Avatar

Meenal Gangurde

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात