महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pakistan Diary : थरपारकर : वाळवंटात उगम पावणारी आशा

X: @vivekbhavsar

सकाळी पाच वाजताच ती आपल्या छोट्याशा कुडाच्या घरातून डोक्यावर पाण्याचा माठ घेऊन बाहेर पडते. अजून ऊन नीट पडलंही नसतं, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असते — शाळेत जायची!

ही गोष्ट आहे थरपारकर जिल्ह्यातल्या छोट्याशा झहरा, फातिमा, सुमेरा अशा हजारो चिमुरड्यांची, ज्या दररोज ४-६ किमी चालत फक्त शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडतात. पाणी नाही, पैसा नाही, आणि घरी आईबापाचाही विरोध असतो, तरी या मुली जिद्दीने शाळा सोडत नाहीत. वाळवंटात काही उगवत नाही, पण या मुलींची उमेद मात्र ताजीतवानी फुलतेय.

pakistani diary

थरपारकर म्हणजे पाकिस्तानातलं एक अगदी मागासलेलं गाव. पावसाचं नावगाव नाही, वर्षभरात १०० मिमी च्या खालीच पाऊस पडतो. उन्हाळ्यात ४५ डिग्री तापमान! अशा ठिकाणी शिकणं म्हणजे स्वप्न बघणं — तेही मुलींसाठी तर अजूनच दूरची गोष्ट. पण हल्ली हळूहळू चित्र बदलताना दिसतंय.

मुलींच्या शिक्षणासाठी काही स्थानिक संस्था, महिला सशक्तीकरणावर काम करणाऱ्या संघटना, आणि परदेशातून येणाऱ्या एनजीओंनी मिळून जोरदार मोहिम चालवल्या आहेत. ‘थार एज्युकेशन अलायन्स’सारखे प्रोजेक्ट सुरू झालेत. गावोगावी पालकांमध्ये जागरूकता वाढतेय. काही छोट्या शाळा सुरू झाल्यात. गावातल्याच महिला आता शिक्षिका म्हणून पुढं येतायत.

सरकारी शाळा नाहीत, शिक्षक कमी, सुविधा नाहीत — सगळ्या अडचणी आहेत. पण गावातल्या महिला “शिक्षिका ताई” म्हणून मुलींना शिकवायला पुढे सरसावल्यात. त्या खूप शिकलेल्या नसल्या तरी, त्यांचं बोलणं, त्यांचा आपलेपणा — यामुळेच मुलींचे आईबाप पोरांना पाठवायला तयार होतात.

थरपारकरमध्ये शाळेत येणाऱ्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली चालत येतात. पायात चप्पल नाही, रस्ता खडकाळ, उन्हाचा तडाखा, वाळवंटात वावटळी, मध्येच उंट दिसतात किंवा एखादा घाबरवणारा प्राणी — पण त्या सगळं पार करत दररोज शाळेपर्यंत पोहोचतात.

“शिकले तरच डॉक्टर होऊन आईचं दुखणं बघता येईल,” असं म्हणणारी नऊ वर्षांची झहरा तिच्या डोळ्यांतून सगळं सांगून टाकते. तिचे वडील मजुरी करतात, आई आयुष्यभर शिकली नाही, पण आता मुलीच्या हातात पुस्तकं बघून तिच्या डोळ्यांतून पाणी येतं.

सध्या तिथे महिलांची साक्षरता फक्त २९ टक्के आहे. पण गेल्या पाच वर्षांत बऱ्याच गावात मुलींची शाळेत नावनोंदणी दुपटीने वाढली आहे. ज्या गावात मुली शिकतात, तिथं बालविवाह कमी झालेत, आणि मुली आरोग्य, स्वच्छता, पोषण याबाबतीतही जागरूक झाल्यात.

शिकलेल्या काही मुलींना गावातच काम मिळतंय — कोणी शिवणकाम करतेय, कोणी शाळेत शिक्षिका झाल्या आहेत. छोटं का असेना, पण हे त्यांचं अर्थकारण तयार होतंय. वाळवंटात आर्थिक ओलावा निर्माण करणाऱ्या या पहिल्या थेंबांसारखं!

थरपारकरच्या या चिमण्या मुली ना कुठल्या टीव्हीवर झळकतात, ना सोशल मीडियावर आहेत, ना त्यांच्या मागे कुठलं राजकारण आहे. पण त्यांच्या पावलांमधून, धुळीच्या पुस्तकांतून, आणि त्या डोळ्यांतून आशेचा एक शुद्ध सूर उमटतो.

क्रांती ओरडून सांगायची नसते. या मुली कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे – पण ठामपणे चालत आहेत. आणि कदाचित हीच चाल – एका नव्या युगाची सुरुवात ठरू शकते.

(मूळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद)

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात