X: @vivekbhavsar
राज्यात गेल्या वर्षीच लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्या… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोघं उपमुख्यमंत्री – एकनाथ शिंदे आणि अजित पवार – सगळं काही सेट झाल्यासारखं दिसतंय. पण राजकारणात काहीही सेट नसतं… सगळं सेटिंगवर चालतं!
मंडळी, शिंदे साहेब गेल्या सोमवारी गुपचूप अमित शहा यांची मुंबईत भेट घेऊन गेलेत. ना फडणवीस होते, ना अजितदादा. एकट्याने जाऊन शाहांकडे काहीतरी कानगोष्टी करून आलेत. आता भेट “सामान्य शिष्टाचारासाठी” होती असं कुणी सांगितलं तर ती चेष्टाच होईल. कारण, ह्या भेटीमागे राजकीय बारकावे आहेत, आणि ते लक्षात घ्यायला हवेत.
सध्या एकनाथ शिंदेंना दोन ठिकाणी “त्रास” आहे – एक म्हणजे अजित पवार, आणि दुसरा म्हणजे त्यांचेच युतीतले भागीदार – भाजपा!
लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या सेनेची काही खास कामगिरी झाली नाही, आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांना एकट्याने दमदार खेळी करायची संधी मिळाली नाही. त्यात अजित पवार वरचढ ठरत असल्यामुळे त्यांचा ‘डायरेक्ट दुसरा क्रमांक’ गेला बाजूला. आता तीसरा नंबर, आणि अनेक जागांवर तिसराही नाही – म्हणजे मग लटकं प्रदर्शन!
शिंदेंची ही नाराजी आता उफाळून वर आलीय असं वाटतं. शाहांना भेटून त्यांनी “अजित पवार कुठल्या प्रमाणपत्रावर आमच्यापेक्षा वरचढ ठरत आहेत ?” अशी थेट तक्रार केली असण्याची शक्यता आहे.
पण मुद्दा इथेच संपत नाही…
पुढच्या काही महिन्यांत, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यात मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे – ही निवडणूक म्हणजे भाजपा, शिंदे सेना, आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.
भाजपा मागच्या वेळेस ८२ जागांवर थांबली होती, आता त्यांना ‘फुल कंट्रोल’ हवा आहे. शिंदेंना मात्र उद्धव ठाकरेंना हरवून दाखवायचंय की “खरी शिवसेना आमचीच!” – पण, भाजपाला हे पचायला थोडं कठीण जातंय. कारण शिंदे सेनेचा उमेदवार जर एखाद्या ठिकाणी मोठा झाला, तर तो भाजपा उमेदवारालाही टक्कर देईल – आणि हाच शिंदेंच्या तक्रारीचा विषय असू शकतो.
*काय घडू शकतं पुढे?*
राजकारणात “मैत्री तात्पुरती असते, आणि मत्सर कायम” – ह्या तत्वावरच खेळ चालतोय. शिंदे आणि भाजपाचं युतीचं नातं आता थोडं कुरकुरायला लागलंय. मुंबई महापालिकेत शिंदे गटाचे उमेदवार भाजपाच्या ‘ब’ प्लॅनमधून कापले, पराभूत केले जात असतील तर हा मुद्दा आधीच दिल्लीपर्यंत पोहोचला असेल.
शिंदेंनी शाहांना सांगितलं असेल – “साहेब, हे भाजपावाले आमचं अस्तिव उडवायला निघालेत! आम्ही सोबत आलो, उद्धव सोडला, आणि आता तुम्हीच आमच्या मूळावर घाला घालत आहात?”
त्यामुळे या भेटीत केवळ अजित पवार नव्हे, तर भाजपाच्या ‘अतिसावध’ राजकारणाचीही चर्चा झाली असण्याची शक्यता प्रबळ आहे.
*शेवटचं एक वाक्य – ही फक्त सुरूवात आहे!*
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय समीकरणं तयार होतील, कोण कुणाला गुपचूप खाली खेचेल, कोणता प्रचारक कुणाच्या पक्षात जाईल – हे सगळं आता फुल्ल गियरमध्ये सुरू होणार आहे.
एक मात्र नक्की – शिंदे यांना आता स्वतःची शिवसेना सिद्ध करायचीय, आणि भाजपाला मुंबई पूर्ण ताब्यात घ्यायची आहे. त्यात अजित पवारसाहेब वेगळेच गणित लावतील.
राजकारणाचे रंग कुठेही वळू शकतात… आणि यावेळी त्याचा रंग महापालिकेच्या निवडणुकीतून दिसून येणार आहे.