कोल्हापूर / मुंबई : मातंग समाजाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सातत्याने प्रयत्नशील आहे. बौद्ध आणि मातंग समाज हे महाराष्ट्रात भाऊभाऊ म्हणून एकत्र आहेत. अनुसूचित जातींमध्ये महाराष्ट्रात प्रमुखतः बौद्ध व मातंग समाज असून, एकूण 59 अनुसूचित जातींना एकत्र करून ओबीसी, मराठा, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजांना निळ्या झेंड्याखाली एकत्र आणणे हे आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
कोल्हापुरातील दसरा चौकात रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीच्या वतीने आयोजित राज्यव्यापी मातंग समाज न्यायहक्क परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेला हजारो मातंग कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी ना. आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या परिषदेत आठवले म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मातंग समाजाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उमेदवारी दिली जाईल. तसेच महायुतीच्या माध्यमातून विविध महामंडळांमध्ये आणि शासकीय समित्यांमध्ये मातंग समाजाला स्थान देऊन सत्तेत योग्य वाटा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या परिषदेस रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली, मातंग आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम सोनवणे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, मंगलराव माळगे, संजय लोखंडे, नंदकुमार साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. आठवले यांनी स्पष्ट केले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देशातील एक सशक्त पर्याय म्हणून उभारण्याचा माझा संकल्प आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, मराठा व इतर सर्व समाज घटकांनी निळा झेंडा हातात घेऊन गावागावातून संघटन बांधणी करावी.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व खंबीर
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली ठाम भूमिका देशातील दलित समाजाला मान्य आहे, असेही ना. आठवले म्हणाले. “पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन्स अभिनंदनीय आहेत. भारत देश सदैव सज्ज आहे आणि मोदींच्या निर्णयांना संपूर्ण देश पाठिंबा देत आहे,” असे ते म्हणाले.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी भांडवल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींचे भांडवल मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देताना ना. आठवले म्हणाले, “मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना विनाअट, विनाजामीन उद्योग कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच महामंडळाच्या अध्यक्ष किंवा संचालकपदी अण्णा वायदंडे यांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.”