६ जूनचा सोहळा ठरला वैचारिक क्रांतीचा प्रेरणास्थान – संभाजीराजे छत्रपती
किल्ले रायगड: ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक गर्दीत पार पडला. शिवभक्तांनी प्रचंड उत्साहाने सहभागी होत मागील सर्व विक्रम मोडीत काढले. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर पुन्हा एकदा शिवकाल अवतरल्याचे चित्र अनुभवायला मिळाले.
या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. पावसाळ्याच्या साजेशा वातावरणात ढोल-ताशे, नगारे, खालुबाजा, शासनकाठी आणि पारंपरिक वेशभूषेतील शिवप्रेमींनी गडाची प्रत्येक वळणं शिवमय केली.

गेल्या दोन दिवसांपासून रायगडावर पारंपरिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण-गोंधळ यांमुळे वातावरण भारावून गेले होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे यंदाचे आयोजन अधिक सुसंघटित व नियोजनबद्ध होते. लाखो शिवभक्त दोन दिवसांपासूनच गडावर दाखल झाले होते.
६ जून रोजी सकाळपासूनच राजसदरेवर उत्सवाला सुरुवात झाली. शिवराज्याभिषेक गीताच्या गजरात विधिवत पूजा पार पडली. महाराष्ट्रातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी संभाजीराजे भोसले आणि त्यांचे पुत्र युवराज शहाजीराजे भोसले हे उपस्थित होते.
शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाले. सिंहासनारूढ शिवमूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेकही करण्यात आला.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, “शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नसून एक वैचारिक क्रांती आहे. छत्रपती शिवरायांचा विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “शासन गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहे. हे गड आमच्याकडे सोपवा, आम्ही त्यांचे संरक्षण करू. शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा व्हावा, ही आमची मागणी आहे.”
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते. शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा जोमाने लढवण्याची ग्वाही दिली.
शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर म्हणाले, “६ जून ही तारीख निसर्गाने कोरून ठेवली आहे. शासनाने गडांवरील निधी वेळेवर द्यावा. शिवरायांविरोधात कुणी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ही जनतेची मागणी आहे.”