शीव, मुंबई : शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आले. सर्व सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, माजी धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी ही घोषणा वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२५-२६ ते २०२९-३० पर्यंत राहणार आहे. या निवडणुकीपूर्वी विरोधी गटाने केलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासून फेटाळले.
बिनविरोध निवडले गेलेले सदस्य पुढीलप्रमाणे:
अॅड. अप्पासाहेब देसाई, नंदकुमार काटकर, रविंद्र घोरपडे, प्रकाश चव्हाण, आनंदराव शिंदे, अमित देसाई, सुरेश देसाई, उर्मिला देसाई आणि शिवराज शिंदे.
या निवडीमुळे विरोधी गटाने पसरवलेल्या बदनामीच्या प्रयत्नांना उत्तर मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. अप्पासाहेब देसाई यांनी दिली.
यापूर्वी सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात त्यांनी संस्थेचा कारभार अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख केला. ३.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या, ११ मजल्यांचे नवे शैक्षणिक संकुलाचे काम सुरू असून, आजअखेर कोणतेही कर्ज न घेता ८० हजार चौरस फूटांचे दोन मजले पूर्ण करण्यात आले आहेत. यामुळे मुंबई व उपनगरांतील विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.
संस्थेची स्थिती नाजूक असतानाही त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आणि संस्थेच्या कार्याला गती दिली. त्यांच्याविरुद्ध सातत्याने तक्रारी करून अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी शांतपणे आणि धीराने काम पुढे नेत संस्थेचा लौकिक वाढवला.
या कार्यासाठी संस्थेला विविध शैक्षणिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.