पंढरपूर – संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांची देणगी दिली. हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाड्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांना संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिंदे म्हणाले, “हे स्थान म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ आहे. या पुरस्कारामुळे कृतार्थ झाल्यासारखे वाटते.” मुख्यमंत्री असताना ‘कॉमन मॅन’साठी काम केले, आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नामदेव महाराजांनी देशभर भागवत धर्माची पताका फडकावली. त्यांनी वारकरी परंपरेतून माणुसकी व भूतदया शिकवली. त्यांच्या कार्यातून समाजसेवा आणि ईश्वरसेवा यांचा संगम दिसतो, असे शिंदे म्हणाले.
राज्यात कोणताही माणूस उपाशी राहू नये, कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशी सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकरी परंपरेच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध
वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी अशी विविध पावले उचलण्यात आली आहेत. तिर्थक्षेत्र विकास निधी २ कोटींवरून ५ कोटींवर नेण्यात आला असून गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.